
रेवदंडा किल्ला (पोर्तुगीजमध्ये “फोर्टालेझा दे चौल”) हा महाराष्ट्रातील रेवदंडा येथे स्थित आहे.
हा किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाशी आहे . रस्त्याने येथे जाणे सोपे आहे. अलिबाग-मुरुड रस्ता किल्ल्यातून जातो. पूर्वी किल्ल्याचे तीनही बाजूंनी खाडीच्या पाण्याने संरक्षण केले जात असे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडून आहे.हा किल्ला पोर्तुगीज कॅप्टन सोज यांनी बांधला आणि १५२४ मध्ये पूर्ण झाला. १८०६ पर्यंत तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, जोपर्यंत तो मराठ्यांनी जिंकला नव्हता. शेवटी १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकला.
रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनाऱ्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोऱ्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोऱ्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिऱ्यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत